लातूर जिल्ह्यातून आषाढी पंढरपूर यात्रेकरिता धावणार 125 एसटी बसेस...
- MahaLive News
- Jun 16, 2023
- 1 min read

लातूर- श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रेकरिता वारक-यांच्या सेवेसाठी एस. टी. महामंडळाने लातूर विभागातून 125 विशेष गा्या सोडण्याचे नियोजन केले आहे. 25 जून ते 5 जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. वारक-यांच्या मागणीनुसार माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठीही विशेष बसेस सोडण्याचे नियोजन लातूर विभागानी केले आहे. लातूर आगारातून 32, निलंगा आगारातून 22, उदगीर आगारातून 28, औसा आगारातून 21 आणि अहमदपूर आगारातून 22 अशा पाच आगारातून पंढरपूर यात्रेसाठी 125 बसेस सोडल्या जाणार आहेत. 125 बसेसचा एक लाख 86 हजार किलोमीटरचा प्रवास होणार असून, त्यातून एस. टी. महामंडळाला 84 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. शिवाय, वारक-यांच्या मागणीनुसार गाडी सोडण्याचे नियोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले आहे.
पंढरपूर यात्रा आरामदायी आणि सुखरुप होण्यासाठी महामंडळाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती विभागीय निरीक्षक अभय देशमुख यांनी दिली. जिल्ह्यातील पाचही आगारातून धावणा-या बसेस या बार्शी-पंढरपूर, तुळजापूर-सोलापूर, निलंगा-सोलापूर -पंढरपूर, उदगीर-लातूर-सोलापूर-पंढरपूर या मार्गावरुन वारक-यांसाठी पंढरपूर यात्रा बसेस धावणार आहेत. या बसेसच्या आगारनिहाय नियोजन करण्यात आले आहे. यात्रा बसेसला सवलतीच्या सर्वच योजना लागू आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत योजना, महिलांसाठी सन्मान योजना, दिव्यांग व अपंगांसाठी सवलत योजनांसह एस. टी. महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी सर्व योजना लागू केल्या आहेत. त्या सर्व योजना यात्रा बसलाही आहेत, अशी माहितीही विभागीय निरीक्षक देशमुख यांनी दिली.
@महाLive News
Comments