शिवसैनिकांचा दसरा मेळाव्यात प्रवेश; मराठवाड्यात दुसरी शाखा स्थापनेत अग्रेसर...
- MahaLive News
- Oct 6, 2022
- 1 min read

जालना- शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब पाऊलबुद्धे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पंडित भुतेकर, भाऊसाहेब घुगे यांच्या नेतृत्वाखाली ते प्रवेश करणार असल्याची माहिती पाऊलबुद्धे यांनी दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेमध्ये अधिकारशाही वाढली. सामान्य शिवसैनिक आणि माणसाचे दुःख जाणून घेणारे पक्षनेतृत्व आता राहिले नसल्याने आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा त्याग करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसमावेशक नेतृत्व असून, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांच्या कृतीतून दिसून येतात. त्यामुळेच आपण शिंदे गटात प्रवेश करीत असल्याचे स्पष्ट केले. मराठवाड्यातील सेनेची दुसरी शाखा अंबड येथे स्थापन झाली तेव्हापासून गावोगावी शिवसेनेच्या शाखा उघडण्यात पाऊलबुद्धे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी सतरा वर्षे तालुकाप्रमुखपद व सात वर्षे उपजिल्हाप्रमुखपद जबाबदारीने सांभाळले. संकटकाळात त्यांनी धडाडीने पक्षकार्य केले. १९९० साली शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाने विधानसभेची निवडणूक लढवली. त्यात थोड्या फरकाने पराभव पत्करावा लागला. पराभवाने खचून न जाता पुढे त्यांनी पक्षकार्य सुरूच ठेवले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले. शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा कसा होईल, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले. विभागीय कापूस पणन महासंघाचे संचालकपदही त्यांनी भूषवले आहे.
Comments