ग्रामीण भागातील युवकांसाठी औसा येथे ३१ मे रोजी भव्य करिअर शिबीर आणि समुपदेशन मेळावा...

लातूर- जिल्ह्यातील औसा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने येत्या 31 मे रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर आणि समुपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय, उद्योग, रोजगाराच्या संधी या विषयी सखोल मार्गदर्शन आणि समूपदेशन व्हावे यासाठी आयोजित या भव्य शिबिराचे उद्घाटन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांची उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार धीरज देशमुख, औसा उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, पोलीस उपाधीक्षक आर.जे इंगवले, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी वाय. आर. म्हेत्रे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.
येत्या ३१ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता शिबीराचे उद्घाटन औसा एम आय डी सी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होईल. यानंतर आर्थिक साक्षरता, शैक्षणिक कर्ज, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास, आय टी आय मध्ये उपलब्ध विविध अभ्यासक्रम, रोजगाराच्या संधी याबाबत तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. औसा तालुक्यातील युवक, युवती आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी एस. बी. वाघमारे, कौशल्य व रोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त बी. एस. मरे तसेच औसा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या आय. टी. रणभिडकर यांनी केले आहे.
Comentários