बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; परीक्षा अर्जासाठी उद्यापर्यंतची मुदतवाढ...

नाशिक- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदा म्हणजेच फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. काही विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याचे राहिल्यामुळे नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत बुधवार (दि.30) पर्यंत वाढविली आहे. विलंब शुल्कासह शुक्रवार (दि.2 डिसेंबर) पर्यंत अर्ज भरता येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सूचना जारी करण्यात आली आहे.
त्यानुसार उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रं सरल डेटाबेसवरुन ऑनलाइन पद्धतीनं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमित विद्यार्थ्यांसह सर्व शाखांचे पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट विद्यार्थ्यांना नियमित शुल्काने आवेदनपत्रं भरण्यास मुदतवाढ दिली जात आहे. सुधारित वेळापत्रकानुसार बुधवार (दि.30) पर्यंत नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येतील. पुढील दोन दिवस शुक्रवार (दि.2) पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत असेल.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन काढून शुल्क बँकेत भरण्यासाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदत असेल. चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या, प्रिलिस्ट जमा करण्याची मुदत 7 डिसेंबरपर्यंत असणार आहे.
Comments