अंधेरी पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता...
- MahaLive News
- Oct 28, 2022
- 1 min read

अंधेरी पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. भाजपने उमेदवारी मागे घेतली असली, तरी अद्याप अनेक अपक्ष उमेदवार या पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील एक अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराने ठाकरे गटाविरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहित गंभीर आरोप केले आहेत. मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात उमेदवारी मागे घेण्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करत ही पोटनिवडणूक रद्द करणयात यावी, अशी मागणी मिलिंद कांबळे यांनी या पत्राद्वारे केली आहे. भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. तसे धमकीही देण्यात आल्याचा आरोप मिलिंद कांबळे यांनी केला आहे. तसेच, अन्य अपक्ष उमेदवारांवर दबाव टाकून त्यांनाही निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी तक्रार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.
Comments