top of page
Search

हिंगोली-रिसोड महामार्गावर ट्रक उलटून एका मजूरासह ८० मेंढ्या दगावल्या; इतर पाच जणांना वाचविण्यात यश..


हिंगोली- हिंगोली ते रिसोड राष्ट्रीय महामार्गावर कोळसा परिसरात ट्रक उलटून एका मजूरासह ८० मेंढ्या दगावल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.२१) सकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. या घटनेतील पाच जणांना वाचविण्यात यश आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. हिंगोली ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गावर सेनगाव जवळील कोळसा शिवारात राजस्थानकडून हैद्राबादकडे मेंढ्या घेऊन जाणारा ट्रकचा अपघात झाल्याची घटना शनिवारी (ता.२१) सकाळी चार वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात ट्रक मधील एका मजूराचा मृत्यू झाला असून ८० मेंढ्याही दगावल्या आहेत. तर गावकऱ्यांच्या सतर्कतेने ट्रक मधील इतर पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी सेनगाव पोलिस दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातून एक ट्रक (क्र.एमपी-३३-एच ७४५५) १८० मेंढ्या घेऊन हैदराबादकडे निघाला होता. याच ट्रकमधे पाच मजूर देखील होते. सदरील ट्रक आज सकाळी चार वाजताच्या सुमारास हिंगोली ते रिसोड मार्गावर कोळसा शिवारात आला असताना चालक सत्येंद्रसिंह चव्हाण (रा. मध्यप्रदेश) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली एक शेतात जाऊन पलटी झाला. यावेळी मोठा आवाज झाल्याने कोळसा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी अपघातात किरकोळ जखमी झालेल्या चालकासह पाच जण सुखरूप बाहेर काढले. मात्र अमरसिंह वय (५०) रा. टोक, राजस्थान) याचा जागीच मृत्यू झाला. अमरसिंह हा ट्रकमधे मागील बाजूस बसले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अमरसिंह मेंढ्याखाली गुदमरून ठार झाला असून या अपघातात ट्रकमधे असलेल्या १८० पैकी ८० मेंढ्याही दगावल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक दिशा लोकडे, उपनिरीक्षक अभय माकणे, जमादार कामाजी झळके, एस. डी. नरवाडे यांनी भेट दिली आहे. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज हिंगोली

Mahalive News


Weather

Frequently

Select Your Choice