मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात रस नाही; अजित पवारांची मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन जोरदार टीका..

मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अकराव्या दिवस आहे. आज अकराव्या दिवशीही अर्थसंकल्पावरुन विरोधकांनी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केले. दरम्यान, “खोदा पहाड, निकला चुहा… शेतकऱ्यांवर अन्याय करणार्या सरकारचा धिक्कार असो… बजेटचा डोंगर, निघाला उंदीर” अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजही विधानभवनाच्या पायर्यांवर येत अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा अकरावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
तर दुसरीकेड सभागृहात सात मंत्र्यांनी गैरहजर असल्यामुळं विरोधीपक्षनेते अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. आज आठ लक्षवेधी होत्या. मात्र, सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे सात लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात अजिबात रस नाही असे म्हणत अजित पवारांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन जोरदार टीका केली. हे अतिशय गलिच्छपणाचं कामकाज चालल्याचे अजित पवार म्हणाले.
सभागृहात मुख्यमंत्री नसतील तर संसदीय कामकाज मंत्र्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात अजिबात रस नाही. यांना बाकीच्या कामातच रस असल्याचे अजित पवार म्हणाले. यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे. अस बोलायला आम्हालाही योग्य वाटत नसल्याचे अजित पवार म्हणाले. सभागृहातील कामाकाजाला मंत्र्यांनी महत्त्व द्यायला हवं असंही अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या वक्तव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेली बाब गंभीर आहे.
काल रात्री एक वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज चालले. ऑर्डर ऑफ डे ही रात्री एक वाजता निघाली. त्यामुळे मंत्र्यांना ब्रिफींगला वेळ मिळत नाही. मात्र, सर्व मंत्र्यांना समज दिली जाईल. याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, आज अधिवेशनाच्या अकराव्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानतंर सदस्य व मंत्र्यांची संख्या खूपच कमी दिसत आहे. याकडे विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गैरहजर असलेल्या मंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला. विधीमंडळ सभागृहाचे पावित्र्य राखलं जात नाही, आम्ही सुद्धा मंत्री होतो, तेव्हा साडे नऊ वाजता विधीमंडळात हजर होत असून, पण आज अनेक मंत्री गैरहजर असल्यानं त्यांना विधीमंडळ कामकाजात रस नसल्याचा घणाघात अजित पवार यांनी केला. आज आठ लक्षवेधी असताना संबंधित लक्षवेधीचे सात मंत्री गैरहजर असताना, याला उत्तर कोण देणार, त्यामुळं मंत्री अनुपस्थित असल्यामुळं आजच्या लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आल्याचं अजित पवार म्हणाले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्री गैरहजर असल्यावरुन नाराजी व्यक्त केली. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील देखील आज गैरहजर आहेत. त्यांना बाकीची काय कामे आहेत? आम्ही सत्तेत किंवा विरोधी पक्षात असताना देखील सकाळी लवकर सभागृहात येत आहोत. मात्र संसदीय कामकाज मंत्री हे मंत्री व विरोधी पक्षांशी संपर्क ठेवत नाहीत. असा संताप करत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे रात्री दोन वाजेपर्यंत काम करताहेत, पण बाकीच्या मंत्री रात्री दोन वाजेपर्यंत काम करताहेत का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित करत गैरहजर असलेल्या मंत्र्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. अशी बोचरी टिका केली.
Comments