top of page
Search

लाॅकडाऊनचा अंतिम इशारा; कडक निर्बंधांची ठेवा तयारी, दोन दिवसांत नवी नियमावली...

Writer: MahaLive NewsMahaLive News

#मुंबई- लाॅकडाऊन हा उपाय नाही, परंतु कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडायला दुसरा उपाय नाही. त्यामुळे उद्या-परवा काही कडक निर्बंध लावावे लागतील. पुढील एक-दोन दिवसांत तज्ज्ञांसह विविध राजकीय पक्षांशी चर्चा करणार आहे. दोन दिवसांत दृश्य स्वरूपात बदल दिसले नाहीत, वेगळा काही उपाय मिळाला नाही तर लाॅकडाऊनला पर्याय नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी लाॅकडाऊनचा अंतिम इशारा दिला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रात्री साडेआठ वाजता राज्यातील जनतेला संबोधित केले. तब्बल ३५ मिनिटांच्या आपल्या संबोधनात मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील वाढता संसर्ग, त्याविरोधात सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा लेखाजोखा मांडला. लाॅकडाऊनच्या शक्यतेवरून भाजपसह सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधात भूमिका मांडली तर आनंद महिंद्रांसारख्या उद्योजकांनी आरोग्य सुविधा वाढविण्याचा सल्ला दिला होता. मुख्यमंत्र्यांनी आज नाव न घेता या सर्वांचा समाचार घेतला. आरोग्य सुविधा वाढविणे म्हणजे फर्निचरचे दुकान नाही. सुविधा वाढविल्या तरी आवश्यक आरोग्य कर्मचारी कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित करतानाच सल्ले देणारे रोज ५० डाॅक्टर किंवा नर्सेसचा पुरवठा करणार आहेत का, असा थेट सवालच मुख्यमंत्र्यांनी केला. तर, राजकीय पक्षांनी लोकांच्या जिवाशी खेळ करू नये. रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱ्या पक्षांनी आता लोकांच्या मदतीसाठी कोरोना विरोधात खरेच रस्त्यावर उतरायला हवे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना रोखण्यासाठी सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही तर पंधरा दिवसांत परिस्थिती हाताबाहेर जाईल. महाराष्ट्रात वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. विलगीकरणातील २ लाख २० हजार खाटांपैकी १ लाख ३७ हजार ५६० भरलेल्या आहेत. २० हजार ५१९ आयसीयू बेड्पैकी जवळपास ४८ टक्के भरले आहेत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलिटर्स बेड २५ टक्के भरले आहेत. ही परिस्थिती अशीच राहीली तर सर्व सुविधा अपुऱ्या पडतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर, लसीकरणाचा वेग दुप्पट करण्याची क्षमता लसीकरणात महाराष्ट्र नंबर एकवर आहे. आतापर्यंत ६५ लाख नागरिकांचे लसीकरण केले. रोज तीन लाख लस देत आहोत. ही क्षमता ६-७ लाख करण्याची तयारी आहे. म्हणूनच अधिकच्या लसींची मागणी करतो आहे. पण केंद्राने पुरवठा वाढवायला हवा. लस म्हणजे धुवांधार पावसातील छत्री लस घेतल्यावरही काही जणांना कोरोनाची बाधा होत आहे. हा मुद्दा पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीत मी उपस्थित केला. तेंव्हा लस घेतली म्हणजे संसर्ग होणार नाही असे नाही, पण त्याची तीव्रता कमी होईल, असे मोदी म्हणाले. त्यामुळे मास्कला पर्याय नाही. लस म्हणजे पावसातील छत्री आहे. आता तर आपण धुवांधार वादळात आहोत, यात लस छत्रीचे काम करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रातील परिस्थिती धक्कादायक वाटत असली तरी जे सत्य आहे ते सांगत आहोत. इतर राज्यांबाबतच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. मला महाराष्ट्र प्यारा आहे, त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे कुणी व्हिलन ठरवले तरी माझी जबाबदारी पार पाडेन, असे मुख्यमंत्री म्हणाले. भारतात गेल्या सहा महिन्यांत प्रथमच २४ तासांत सर्वात जास्त म्हणजे ८१ हजार ४६६ कोरोना विषाणूबाधित रुग्णांची नोंद झाली. या संख्येमुळे एकूण रुग्णसंख्या आता १,२३,०३,१३१ एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार २ ऑक्टोबर, २०२० पासून एका दिवसात सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली. ४६९ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या १,६३,३९६ झाली आहे. गेल्या ६ डिसेंबरनंतर प्रथमच एका दिवसात सर्वात जास्त (२ एप्रिलच्या सकाळी आठ वाजेपर्यंत) ४६९ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग २३व्या दिवशी रुग्णसंख्या वाढलेली आहे. दिल्लीत चौथी लाट आहे, पण परस्पर लॉकडाऊन लागू करणार नाही, जनतेचे म्हणणे जाणून घेऊ, असे स्पष्ट प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केले. लॉकडाऊनमुळे गरिबांचे नुकसान होत आहे. औद्योगिक प्रगतीत अडथळा येत आहे. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा, अशी मागणी उद्योगपती राजीव बजाज, आनंद महिंद्रा, अझिम प्रेमजी यांनी केली आहे.

@महालाईव्ह न्यूज मुंबई

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page