राज्यात 1 लाख 47 हजार लहान मुलांना लागण, मुंबईत सर्वाधिक मुले पॉझिटिव्ह...

#मुंबई- कोरोनाच्या दुसऱया लाटेचा राज्याला जबर फटका बसला आहे. या लाटेने अधिकतर लहान मुलांना आपल्या विळख्यात घेतले आहे. रोज सुमारे 500 लहान मुलांना कोरोनाची लागण होत आहे. त्यातील सर्वाधिक मुले ही मुंबईतील आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात 1 ते 10 वर्षे वयोगटातील 1 लाख 47 हजार 420 लहान मुले तर s 11 ते 20 वर्षे वयोगटातील 3 लाख 33 हजार 926 लहान मुले आणि तरुण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईत लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी 10 वर्षे वयापर्यंतच्या 11 हजार 80 मुलांना कोरोनाची लागण झाली होती तर 17 मुलांचा मृत्यू झाला होता.
पहिल्या लाटेपेक्षा सध्याच्या दुसऱया लाटेत रुग्णालयामध्ये दाखल होणाऱया मुलांची संख्या दीड ते दोन टक्के अधिक असल्याचे बालरोग तज्ञ डॉक्टर सांगतात. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी लहान मुले बाहेर अधिक खेळत होती आणि त्यामुळेच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असे त्यांचे म्हणणे आहे. लहान मुलांना कोरोनाची लागण होत असली तरी त्यांच्यात रिकव्हरीचे प्रमाणही चांगले आहे. कारण लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. त्याचप्रमाणे बहुतांश लहान मुलांना इतर कोणताही आजार नसतो. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह आले तरी 3-4 दिवसांत ती बरी होतात अशी माहितीही बालरोग तज्ञ देतात. बहुतांश मुलांना कोरोनाची लागण त्यांच्या पालकांकडून झाली आहे. बरेच कोरोनाबाधित हे घरीच क्वारंटाईन होत असल्याने त्यांच्यापासून त्यांच्या मुलांना लागण होते. लहान मुले पॉझिटिव्ह आढळली तरी ती बहुतांशी निरोगी असल्याकारणाने बरीही होत आहेत. - डॉ. मुकेश अगरवाल, केईएम परळ येथील वाडिया रुग्णालयात मार्च आणि एप्रिल महिन्यादरम्यान 5 कोरोनाबाधित मुले दगावली. 2020 मध्ये फक्त तीन मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मे-जून 2020 दरम्यान वाडिया रुग्णालयातील 76 मुलांना कोरोनाची लागण झाली होती. मार्च-एप्रिलदरम्यान 103 मुले बाधित आढळली. नायर रुग्णालयात एप्रिल महिन्यापर्यंत 43 कोरोनाबाधित लहान मुलांना दाखल करण्यात आले होते आणि 4 मुलांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 9 महिन्यांच्या एका मुलासह तीन नवजात बालकांचा समावेश होता तर एक 11 वर्षांची मुलगी होती. हाजीअली येथील एसआरसीसी बाल रुग्णालयातही कोरोनाबाधित लहान मुलांना दाखल केले जात आहे. गेल्या मार्चमध्ये तिथे एका लहान मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. शीव रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागात रोज 4-5 कोरोनाबाधित लहान मुले दाखल होत असल्याची माहिती तेथील बालरोगतज्ञांनी दिली. दाखल होणाऱया बहुतांश मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळत असल्याने उपचारानंतर ती बरीही होत आहेत.
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments