मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली; तीन आठवड्याच्या लॉकडाऊन होण्याची शक्यता...

#मुंबई- राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबात चर्चा केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज्यात तीन आठवड्याच्या लॉकडाऊन लावायचा की नाही यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच जर हा लॉकडाऊन लावण्यात आला तर मग नियमावली गाईडलाईन्स कशा प्रकारे करायच्या, याबद्दल या बैठकीत चर्चा होऊ शकते. राज्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यानुसार शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. वीकेंड लॉकडाऊनमुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अनेक शहरात, जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात कडकडीत लॉकडाऊन पाळला जात आहे. राज्यात कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. दोन दिवसात आहे तो साठाही संपुष्टात येणार आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. केंद्राकडून लस येईपर्यंत राज्यात लॉकडाऊन करण्याची सरकारची मानसिकता असून त्यासाठीही विरोधकांची मते जाणून घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर आहे. या नव्या स्ट्रेनमुळे एका व्यक्तीपासून अनेक लोक बाधित होत आहेत. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्याची गरज आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तेवढा अवधी देण्याची गरज आहे. त्यामुळेच लॉकडाऊन कसा अपरिहार्य आहे, हे विरोधकांना समजावून सांगण्यासाठी आणि कोरोनावर नियंत्रण कसं आणता येईल? विरोधी पक्षांच्या याबाबत काय सूचना आहेत? हे जाणून घेण्यासाठीही उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावल्याचं सूत्रांनी सांगितलं. महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 58 हजार 993 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 301 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 45 हजार 391 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 32 लाख 88 हजार 540 वर पोहोचली आहे. त्यातील 26 लाख 95 ङजार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 57 हजार 329 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 5 लाख 34 हजार 603 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments