top of page

महाराष्ट्र आता कोरोना लसी परदेशातून आयात करणार; लसीकरणाचा कार्यक्रम व्यापक करण्याचा निर्णय...


#मुंबई- राज्यातील लसीकरणाचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी राज्य सरकार आता परदेशातून कोरोनाच्या लसी आयात करणार आहे. तसेच ब्रिटनच्या धर्तीवर राज्यातील सर्व खात्यांचा फंड आता कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. देशातील 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून महाराष्ट्र सरकारने या निर्णयाचे स्वागत केलं आहे. राज्यात आता व्यापक स्तरावर लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार असून त्याला निधी कमी पडला तर ब्रिटनच्या धर्तीवर राज्यातील सर्व खात्यांच्या फंडात कपात करण्यात येईल आणि तो फंड लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात दररोज सात लाख कोरोना लसींची आवश्यकता असताना केंद्राने लसीच्या पुरवठ्यावर बंधने घातली आहेत. त्यामुळे दररोज केवळ तीन लाखच लसी देण्यात येतात असं राज्य सरकाररडून या आधी सांगण्यात आलं होतं. राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना ब्रिटनच्या आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाईल असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ब्रिटनमध्ये गेल्या वर्षी आणि या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. आतापर्यंत ब्रिटनमध्ये 60 टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यामुळे सध्या कोरोनाची रुग्णसंख्या आणि त्याचे मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आलं आहे. संपूर्ण ब्रिटनमध्ये तीन महिने लॉकडाऊन लावण्यात आलं होतं आणि या काळात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात आला होता. राज्यातील मुख्य सचिव आणि अर्थ, आरोग्य खात्याच्या प्रधान सचिवांना कोरोनाच्या लसीकरणाचा खर्च आणि आवश्यक साहित्यांचा खरेदी खर्च किती येईल याचा अंदाज काढण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात सापडत असून गेली दोन आठवडे दररोज 50 हजाराहून जास्त नव्या रुग्णांची भर राज्यात पडत आहे. मंगळवारी राज्यात 62 हजार 97 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात एकूण 6 लाख 83 हजार 856 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच 519 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 1.55 एवढा झाला आहे.दिलासादायक बाब म्हणजे 54 हजार 224 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 13 हजार 464 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.14 टक्के झाले आहे.

@महालाईव्ह न्यूज मुंबई

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page