पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते 900 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन...
- MahaLive News
- Jun 18, 2021
- 2 min read

लातूर- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याचे प्रस्तावित होते. त्या अनुषंगाने हरंगूळ जलशुद्धीकरण केंद्र परिसरात 900 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीच्या कामाचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, महापालिकेचे विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, नियोजन समिती सदस्य ॲड. किरण जाधव, समद पटेल, अभियंता कलवले, मेडा चे अधिकारी व महापालिकेचे नगरसेवक, अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी या सौर ऊर्जा प्रकल्प बाबत महापौर व महाराष्ट्र सौर ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. हा सौर ऊर्जा प्रकल्प लातूर महानगरपालिका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा पहिला टप्पा असून याच जलशुद्धीकरण केंद्र परिसरात सहाशे किलोवॅट चा दुसरा सौर ऊर्जा प्रकल्प होत असून महापालिकेमार्फत इतर योजनेतून रेणापूर तालुक्यात पाथरवाडी येथे पाच मेगावॅटचा आणखी एका सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून यात तीन प्रकल्पातून एकूण साडेसहा मेगावॅट वीज निर्माण केली जाणार आहे. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र परिसर येथील सौर ऊर्जा प्रकल्प लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत योजनेअंतर्गत निर्माण केला जात असून या प्रकल्पासाठी 3 कोटी 41 लाखांचा निधी प्रस्तावित असून हा निधी महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्य सौर ऊर्जा कार्यालयाला हस्तांतरित केलेला असून या प्रकल्पाचे काम हे या कार्यालयाकडून नियंत्रित केले जात असल्याची माहिती अभियंता कलवले यांनी देऊन हा प्रकल्प माहे डिसेंबर 2021 अखेर पर्यंत पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्राचे पाणीपुरवठ्यासाठी महावितरण कंपनीकडून वापरल्या जाणाऱ्या विजेचे प्रतिमहा बिल हे तीस लाखापर्यंत येते. या जलशुद्धीकरण केंद्राचा वीज वापर हा प्रतिमहा तीन लाख 80 हजार युनिट इतका आहे. यासाठी हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास महापालिकेच्या हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्राची किमान सरासरी प्रतिमहा दहा लाख रुपयांची बचत होणार असल्याची माहिती अभियंता कलवले यांनी दिली.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Comments