पंतप्रधान नरेंद्र मोदी लातुरच्या शेतकऱ्यांना म्हणाले, बरे आहात ना? काळजी घ्या..!
- MahaLive News
- May 15, 2021
- 1 min read

#लातूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील निवड शेतकऱ्यांशी शुक्रवारी (ता. १४) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शेतीच्या संदर्भात वेगवेगळ्या विषयावर संवाद साधला. यात महाराष्ट्रातून जिल्ह्यातील चिंचोलीराव वाडीच्या एका शेतकऱ्याचाही समावेश होता. ‘या दिवसांत कोणते पीक घेता?, किसान क्रेडिट कार्ड योजनेचा फायदा झाला का?’ असे प्रश्न पंतप्रधानांनी हिंदीतून विचारल्यानंतर या शेतकऱ्यानेही हिंदीतूनच उत्तरे दिली.

शेवटी पंतप्रधानांनी मराठीतून ‘बरे आहात ना? काळजी करा!’ असे आवाहन या शेतकऱ्याला केले. किसान सन्मान योजनेअंतर्गत १९ हजार कोटी रुपये देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. याचे औचित्य साधून श्री. मोदी यांनी शुक्रवारी देशभरातील काही शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यात महाराष्ट्रातून चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे खातेदार शेतकरी बाळासाहेब नरारे सहभागी झाले होते. यात पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीला ‘बाळासाहेब, तुम्ही अनुभवी शेतकरी आहात, या दिवसांत कोणते पीक घेता? शेती सोडून दुसरा कोणता व्यवसाय करता?’ असा प्रश्न श्री. नरारे यांना विचारला. यावर श्री. नरारे यांनी ‘पाच एकर जमीन आहे. त्यात सोयाबीन, ज्वारी, हरभरा असे पीक घेत आहे. विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण देतो,’ असे सांगितले. लहान शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्ज मिळावे म्हणून केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डची व्याप्ती वाढवलेली आहे. त्याचा आपल्याला काय फायदा झाला असा प्रश्न मोदी यांनी नरारे यांना विचारला. ‘आतापर्यंत मी नातेवाइकांकडून दहा-वीस हजार रुपये उसने घेऊन शेती करीत होतो. पण, वर्षभरापूर्वी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने किसान क्रेडिट कार्डसंदर्भात येथे मेळावा घेण्यात आला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी याचे फायदे आम्हाला सांगितले. कर्जासाठी लागणारे कागदपत्रेही त्यांनी तयार करून दोन दिवसांत एक लाख ५८ हजार रुपयांचे कर्ज दिले. याचा शेतीसाठी मोठा फायदा झाला. गेल्या वर्षी २० कट्टे सोयाबीन झाले होते. यावर्षी ४० कट्टे सोयाबीन काढता आले. इतर पिकेही घेता आली’, अशी माहिती श्री. नरारे यांनी पंतप्रधानांना दिली.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज लातूर
ความคิดเห็น