top of page

दोन दिवसांत सुरू होणार पंढरपुरात तीन नवीन कोव्हिड डेडिकेटेड हॉस्पिटल्स...


#पंढरपूर- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंढरपूर शहरात नव्याने तीन कोव्हिड डेडिकेटेड हॉस्पिटलला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली आहे. येत्या दोन दिवसांत ही तिन्ही हॉस्पिटल्स सुरू होणार असून, तिन्हींमध्ये मिळून एकूण 75 बेडची व्यवस्था असणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. पंढरपूर शहर व तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सध्या पंढरपूर शहरात उपजिल्हा रुग्णालय, गॅलॅक्‍सी हॉस्पिटल, लाईफलाइन हॉस्पिटल, श्री गणपती हॉस्पिटल, जनकल्याण हॉस्पिटल, ऍपेक्‍स हॉस्पिटल, श्री विठ्ठल हॉस्पिटल आणि करकंब येथील जगताप हॉस्पिटल अशा आठ ठिकाणी मिळून 451 रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्व ठिकाणचे बेड फुल्ल झाले असल्याने कोरोना बाधित रुग्णांना कुठे ऍडमिट करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन शहरात वरद विनायक (कराड रोड), पावले हॉस्पिटल (अर्बन बॅंकेजवळ) आणि मेडिसिटी या तीन हॉस्पिटलला कोव्हिड हॉस्पिटलसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. त्याची तत्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी वरद विनायकमध्ये 35 तर पावले आणि मेडिसिटीमध्ये प्रत्येकी वीस याप्रमाणे एकूण 75 बेड्‌सना मान्यता दिली आहे. येत्या दोन दिवसांत या तीनही हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केले जाणार आहेत. शहर व तालुक्‍यातील 451 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 412 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून 39 रुग्ण संशयित आहेत. यापैकी सहा रुग्ण व्हेंटिलेटरवर असून 343 जणांना ऑक्‍सिजन द्यावा लागत आहे. पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. संबंधित रुग्णांचे नातेवाईक इंजेक्‍शन मिळवण्यासाठी शहरात सर्वत्र फिरत आहेत. जिल्हाधिकारी यांनी पंढरपूर शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन पंढरपूरसाठी जास्त उपलब्ध करून देण्याची गरज आहे.


Komentar


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page