एकाच वेळी पेटल्या २३ चिता; मृतदेह एवढे की जमीन पडली कमी, मृत्यूचे भयावह चित्र...
- MahaLive News
- Apr 17, 2021
- 1 min read

#उस्मानाबाद- देशात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. देशातील काही भागांतून भयावह फोटो समोर येत आहेत. काही ठिकाणी कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असल्याने स्मशानामधील दाहक चित्र या फोटोच्या माध्यमातून देशवासियांना दिसत आहे. अशीच भयावह माहिती उस्मानाबादमधून समोर आली आहे. येथे एकाच वेळी २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र मृतदेहांचे प्रमाण एवढे अधिक होते की, त्यामुळे अंत्यसंस्कारांसाठी जागा कमी पडत आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ इंडिया हिंदी या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तात देण्यात आलेल्या माहितीनुसार उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २३ जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या नातेवाईकांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. सातत्याने येत असलेल्या मृतदेहांमुळे स्मशानभूमीतील व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे काही मृतदेहांवर जमिनीवरच अंत्यसंस्कार करावे लागले. मात्र असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. यापूर्वीही १४ एप्रिल रोजी १९ मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. उस्मानाबादमध्ये आतापर्यंत ६९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यामध्ये कोरोनाचे ५८० नवे रुग्ण सापडले आहेत. तर २३ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण २८ हजार ९७८ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रामध्येही काल पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली. महाराष्ट्रात काल दिवसभरात ६३ हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ३९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासातं ४५ हजार ३३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
@महालाईव्ह न्यूज उस्मानाबाद
Comments