MahaLive News

fullDate

लातूरात तीन दिवसांत चार भूकंपाचे धक्के, हासोरी गावात नागरिकामधे भीतीचे वातावरण...

लातूर- मागील काही दिवसांत लातूर जिल्ह्यातील हासोरी भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहे. मागील तीन दिवसांत चार धक्के जाणवल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी रोजी रात्री ८ वाजून ५७ मिनिटांनी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहे.

तर, भूकंप मापन केंद्रावर 1.6 रिश्टर स्केलची नोंद करण्यात आली आहे. प्रशासनाकडून एक धक्का जाणवल्याची माहिती देण्यात आली असून, गावकऱ्यांनी मात्र दोन धक्के अनुभवले असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी याच भागात दोन महिन्यात नऊ धक्के जाणवले होते. गेल्या वर्षभरापासून हासोरी आणि उस्तुरी या भागामध्ये सातत्याने जमिनीखालून आवाज येत असून, हादरे बसत आहेत. बरेच दिवस प्रशासनाने जमिनीमध्ये होणाऱ्या बदलामुळे हे आवाज येत आहेत असं सांगितलं होतं. मात्र आता हे भूकंपाचे धक्के असल्याचे मान्य करण्यात आले आहे. गेल्यावर्षी याच काळात नऊ धक्के जाणवले होते. यावर्षी 2 ऑक्टोबरला तीन धक्के जाणवले होते. त्यानंतर बुधवारी रात्री आठ वाजून 49 मिनिटाला एक आणि आठ वाजून 57 मिनिटाला एक असे दोन धक्के जाणवले. परंतु, प्रशासनाकडून एकच धक्का जाणवल्याचे सांगितले आहे. गूढ आवाजासह जमीन हदरल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

प्रशासनाला वेळोवेळी याची माहिती गावकरी आणि सरपंच देत आहेत. मात्र, प्रशासकीय पातळीवर नागरिकांच्या जीवितासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. यामुळे गावातील नागरिक संतप्त झाले आहेत. बुधवारी रात्री नऊच्या सुमाराला जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याची माहिती प्रशासनाला कळताच तलाठी बबन राठोड, नायब तहसीलदार अनिल धुमाळ यांनी गावात येत माहिती घेतली. मात्र, गावात आलेल्या या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी घेराव घालून जाब विचारला.